‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री आंध्र प्रदेशमध्ये

गृहमंत्री अनिल देशमुख आंध्र प्रदेशमध्ये पोहचले आहेत. गृहमंत्र्यांसोबत त्यांचे शिष्ठमंडळ देखील आहे.
या शिष्ठमंडळामध्ये अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अश्वती दोरजे अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
विजयवाडा येथे गृहमंत्री आणि त्यांच्या शिष्ठमंडळाचे आंधप्रदेश पोलिसांकडून स्वागत करण्यात आले.
दिशा कायद्यासंदर्भात आज गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे शिष्टमंडळ आंध्रप्रदेश सरकारसोबत दिशा कायद्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
या चर्चेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाई एस जगनमोहन रेड्डी, आंध्रचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक उपस्थित असणार आहेत.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकार संवेदनशील आहे. राज्यात कठोर कायदा आण्ण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
त्यानुसार आम्ही आंध्र प्रदेशमधील दिशा कायदा जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांबरोबर जाणार आहोत, अशी माहिती स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी दिली होती.
दिशा कायद्याबद्दल थोडक्यात
महिलांवर अत्याचार करणाऱ्या वाईट विकृतांना कठोर शिक्षा देणं. ती शिक्षा अवघ्या २१ दिवसांमध्ये देण्यात यावी, अशी तरतूद ही दिशा कायद्यामध्ये करण्यात आली आहे. हा कायदा आंध्र प्रदेशमध्ये लागू केला आहे.
महाराष्ट्रात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातही दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी केली जात आहे.
त्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आंध्र प्रदेशमधील मंत्र्यांसोबतच्या चर्चेत काय होतं, याकडं साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.