Sun. Oct 17th, 2021

फक्त १० महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या आषाढी वारी सोहळाळ्यातील वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली.पुण्यामध्ये आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. कोरोना परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने देहू,आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे, तर प्रस्थान सोहळ्यात ५० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

पंढरपूरपर्यंत पायी वारी यावर्षीही होणार नाही. मात्र यावर्षी दोन बसेस पालखी सोहळ्यासाठी देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने केवळ १० पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली असून या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात दाखल होतील. मुख्य मंदीर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे.

तसेच वारी सोहळ्यात सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी आवश्यक असणार आहे, असंदेखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.त्याचप्रमाणे, शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षी प्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ‘महाविकास आघाडी सरकार हे मुघलांचं सरकार आहे. माविआ सरकारला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा ह्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वारकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचं खंडन करणारं हे महाराष्ट्रद्रोही सरकार आहे ‘, अशी प्रतिक्रिया ‘जय महाराष्ट्र’ला दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *