मुख्यमंत्री आज रात्री ८ वाजता जनसंबोधन करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता राज्यातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. मुंबईतील लोकलसंदर्भातही राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शिवाय राज्यातील हॉटेल व्यवसायिकांनाही हॉटेलच्या वेळा वाढवून हव्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी दुकानदार आणि व्यापारीही बंडखोरीच्या प्रयत्नांत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात अजूनही काही निर्बंध कायम आहेत. यामध्ये सर्वसामान्यांचा मुंबई उपनगरीय लोकल रेल्वे प्रवास, मंदिरं बंदच आहेत. रेल्वे लोकलविना सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोकल सुरु करण्यासोबतच सर्व निर्बंधांमधून मुक्त करावं, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी यासाठी भाजप, मनसे या विरोधी पक्षांसह सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणती मोठी घोषणा करतात? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.