Thu. May 19th, 2022

‘मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’

खासदार संभाजीराजे भोसले यांनी ६ जूनपर्यंत मराठा आरक्षणाविषयी ‘सरकारने ठोस भूमिका घेतली नाही तर आम्ही भूमिका जाहीर करू’,असा इशारा दिला होता. त्यानुसार रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे.

‘आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे’, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी भूमिका मांडली आहे. यावेळी येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढण्याचा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे.

‘आत्ताच्या सरकारला हात जोडून विनंती केली. पण तरी काही फरक पडत नाही. पण यापुढे तुम्ही माझा संयम बघूच शकणार नाही. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे’, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

‘शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणाहून आमचा पहिला मोर्चा निघणार आहे. कोविड संपल्यानंतर देखील तु्म्ही ठोस पावलं उचलली नाहीत, तर संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल’, असंदेखील संभाजीराजे म्हणाले.

‘सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. तो एसीबीसीमध्ये येऊ शकत नाही. म्हणून समाजाला मिळालेलं आरक्षण काढून घेण्यात आलं. पण माझा लढा ७० टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. मागच्या सरकारचे लोकं म्हणाले आत्ताच्या सरकराने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचं सरकार म्हणतंय तुम्ही कायदा बरोबर केला नाही. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही’, असंदेखील संभाजीराजे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.