Jaimaharashtra news

‘मोदींच्या चेहऱ्यामुळे भाजपला यश’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही’, असं शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

‘नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे नेते असून ज्या पक्षातून ते पुढे गेले आहेत त्यांना प्रत्येक निवडणूक त्यांच्या नावावरच जिंकावी असं वाटत असेल. अटलबिहारी वाजपेयींचाही फोटो सर्व ठिकाणी वापरला जात होता. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा आणि फोटोही कार्यकर्ते वापरत असतात. आदेश काढला म्हणून चेहरा वापरणं थांबत नाही’,असंदेखील राऊत म्हणाले.

तसेच मोदींनी प्रचाराला जाताना पंतप्रधान म्हणून जाऊ नये आणि पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करु नये ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. मनमोहन सिंग किंवा इतर कोणीही असलं तरी पंतप्रधान म्हणून त्यांनी प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान असतात, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

भाजपकडून सुरु असणाऱ्या बैठकांबाबत विचारले असता, भाजपाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हालचाली सुरु केल्या असतील तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजपा राज्यातील प्रमुख आणि मोठा विरोधी पक्ष असून त्यांनी अशा बैठका घेणं अपेक्षित आहे’, असं राऊत म्हणाले आहेत.

 

Exit mobile version