चुकीच्या वर्तनामुळे लिओनेल मेस्सीला मिळाले लाल कार्ड

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा नेहमीच त्याच्या खेळामुळे चर्चेत असतो. यावेळी मेस्सीला चुकीच्या वर्तनामुळे त्याला लाल कार्ड मिळाले आहे. बार्सिलोनाचा खेळाडू म्हणून हे मेस्सीचे पहिले लाल कार्ड आहे. या क्लबसाठी त्याने ७५३ सामने खेळले आहेत. रविवारी झालेल्या सामन्याच्या अतिरिक्त वेळेत मेस्सीने अॅथलेटिक क्लबचा खेळाडू एशियर व्हॅलालिब्रेविरूद्ध चुकीचे वर्तन केलं होतं. मेस्सीला प्रथमच आपल्या क्लब कारकिर्दीत लाल कार्ड मिळाले आहे.
स्पॅनिश सुपर कप फायनलमध्ये बार्सिलोनाला अॅथलेटिक क्लबकडून २-३ असा पराभव स्वीकारावा लागला. ४०व्या मिनिटाला अँन्टोईन ग्रिझ्मनने गोल करून बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनंतर ओस्कर डी मार्कोसने गोल करून सामन्यात बरोबरी साधली असून ग्रिझ्मनने ७० व्या मिनिटाला आणखी एक गोल करून बार्सिलोनाला पुन्हा एकदा आधार दिला. ९०व्या मिनिटाला एसिअर व्हिलालिब्रे आणि तीन मिनिटानंतर इनाकी विल्यम्सने गोल करत अथलेटिकच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. लिओनेल मेस्सीने ब्राझीलचे दिग्गज माजी फुटबॉलपटू पेले यांचा सर्वाधिक गोलचा (क्लबकडून खेळतानाचा) विक्रम मोडला. काही दिवसांपूर्वी वॅलाडॉलिड संघाविरुद्ध गोल करत बार्सिलोनाच्या मेस्सीने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. शिवाय बार्सिलोनासाठी ६४४ पेक्षा जास्त गोल नोंदवत एखाद्या क्लबकडून खेळताना सर्वाधिक गोल करणारा मेस्सी हा पहिला खेळाडू ठरला आहे. पेले यांनी क्लब सांतोसकडून खेळताना ६४३ गोल केले होते. १९७४मध्ये पेले यांनी सांतोससाठी शेवटचा सामना खेळला होता.