महिलांच्या डब्यात हस्तमैथुन करणाऱ्याला बेड्या

वसई नायगाव येथील दोन महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे महिला डब्यात हस्तमैथुन करणाऱ्या 25 वर्षीय युवकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या महिलांनी रेल्वे हेल्पलाईन 1512 वर याची माहिती दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली.
वसई रेल्वे लोकमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मार्च रोजी दुपारी 2.52 च्या लोकलमध्ये नायगाव येथून दोन महिला प्रवासी चढल्या. या डब्यात आधी पासून चढलेला युवक मनीष कुमार बंसीलाल मिश्रा हा वसई खाडी येताच दरवाजाजवळ येऊन महिलांच्या देखत हस्तमैथुन करु लागला.
त्याचं हे कृत्य पाहून महिला घाबरल्या. काही महिलांनी त्याला हटकलं. पण त्यांच्याकडे रागाने पाहात हस्तमैथून करू लागला. तेव्हा काही महिलांनी मोबाईलमध्ये त्याचं शुटिंग करुन रेल्वे हेल्पलाईन 1512 वर संपर्क करुन माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ भादवी 354 (अ), 509, रेल्वे अॅक्ट 162 प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
भाईंदर रेल्वे स्थानकातून लोकल ट्रेन पकडून नालासोपाऱ्याला घरी जात असताना त्याला पथकाने पकडलं. याबद्दल बोलताना पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी ‘माहिला प्रवाशांनी घाबरुन न जाता त्याच्या कृत्याचं मोबाईल शुटिंग करुन आम्हाला दिलं. त्यामुळेच आम्ही त्या आरोपीपर्यंत पोहचू शकलो.’ अशा शब्दात कौतुक केलं. महिलांनी अशा प्रकारे सतर्क रहावं असं आवाहनही केलं.