Thu. Dec 2nd, 2021

आमदारकीच्या तिकीटासाठी मागितले होते १० कोटी, ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

माझ्याकडे आमदारकीच्या तिकीटासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीयांनी १० कोटी मागितले होते, असा गौप्यस्फोट आपच्या आमदाराने केला आहे.

बदरपूर विधानसभा मतदारसंघातून आपचे विद्यमान आमदार असलेले एनडी शर्मा यांनी आरोप केला आहे.

मनिष सिसोदिया यांच्या १० कोटी रुपयांच्या मागणीमुळे मी हैराण होतो. तसेच मी १० कोटी देण्यास नकार दिला असल्याचं एनडी शर्मा यांनी सांगितलं.

दरम्यान एनडी शर्मा यांनी आप पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता अपक्ष निवडणूक लढवणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने मंगळवारी ७० उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये १५ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं गेलं. यामध्ये एन डी शर्मा यांचाही समावेश आहे.

काय म्हणाले एनडी शर्मा ?

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मला त्यांच्या निवासस्थानी बोलावलं.

राम सिंह हे बदरपूर विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं, मनिष सिसोदिया यांनी मला सांगितलं.

तसंच या मतदारसंघासाठी राम सिंह हे २०-२१ कोटी रुपये देण्यास तयार असल्याचं मनिष सिसोदिया यांनी सांगितलं.

यावेळी माझ्याकडे मनिष सिसोदियांनी १० कोटींची मागणी केली. परंतु मी पैसे देण्यास नकार दिला आणि त्यांच्या घरुन निघालो.

यानंतर मी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती एनडी शर्मांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

संजय सिंह यांचे स्पष्टीकरण

एनडी शर्मा यांनी केलेल्या आरोपांचं आप पक्षाकडून खंडन करण्यात आलं आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची बाजू मांडली.

जेव्हा एखाद्या उमेदवाराचं तिकीट कापलं जातं, तेव्हा त्या उमेदवाराकडून नाराजी व्यक्त केली जाते. आणि हे स्वाभाविक असतं.

उमेदवारी नाकारल्यावर अशा प्रकारचं वक्तव्य करणं साहजिक असतं. असे संजय सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *