Mon. Apr 19th, 2021

आज इतकी भयाण शांतता का?

मराठ्यांच्या आरक्षणाचं घोडं पुन्हा अडलं आहे.

शशांक पाटील , जय महाराष्ट्र, मुंबई : –  मागील काही वर्षांत महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीतील बदलासाठी महत्त्वाचा घटक ठरलेलं मराठा आरक्षणाचं घोडं नक्की अडलंय तरी कुठं? हा प्रश्न विद्यमान राज्य सरकारने दिलेल्या निर्णयानंतर मराठा समाजाला पडलाय. मागील बऱ्याच वर्षांपासून सुरु असलेला मराठा आरक्षणाचा लढा फडणवीसांच्या सरकारमध्ये मोठ्या वेगात सुरु होता. आरक्षण मिळते न मिळते तोच प्रचारात ‘पाऊस’ पाडत राजकीय तडजोड करत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर, जणू राज्यात आरक्षणाच्या लढ्याला नजरच लागली. वर्षपूर्तीच्या आतच ९ सप्टेंबर, २०२० रोजी न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. आता तर शिक्षणातील मराठा आरक्षणही रद्द करत प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचे आदेश लागू झाले आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाचं घोडं पुन्हा अडलं आहे.


आतापर्यंत ५८च्या जवळपास मूक मोर्चे, दोन ठोक मोर्चे आणि चाळीसहून अधिक मराठा बांधवाच्या मृत्यूनंतरही जर १६ टक्के आरक्षणाची मागणी पूर्ण होत नसेल, तर नक्की आरक्षण का मिळत नाही हा प्रश्न समाजात प्रत्येकाला पडल्याशिवाय राहात नाही.


आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने कोणताही समाज एकवटला नव्हता, ५० हून अधिक मूक मोर्चे काढले गेले नव्हते. भारताच्या इतिहासातील ही अभूतपूर्व कामगिरी करणाऱे मराठा बांधव आरक्षणासाठी जर इतके आक्रमक असतील तर आजच्या या धक्कादायक निर्णयानंतर इतकी भयाण शांतता का? हा सर्व असंतोष कुठं दडून बसलाय? काही मोजक्या संघटना सोडल्यातर बरेच मोठे मराठा नेते अजून शांत का? विरोधी बाकांवर असतांना ठोकायची भाषा करणारे मंत्रीपदाच्या शपथीनंतर शांत झालेत का? आता नक्की या समाजाचा वाली कोण? अशा एक ना अनेक प्रश्नांनी मराठा बांधव चक्रावून गेलेत.
सत्तेतले सत्ता उपभोगण्यात शांत आणि विरोधातले शक्य तितकं केलं असं सांगून शांत. या शांततेत मराठा विद्यार्थी आणि तरुणांचे हाल ही शांतपणे सुरु आहेत. त्यामुळे ही शांतता मोडून काढण्यासाठी, नेत्यांना जागे करण्यासाठी, साटेलोटे संपवण्यासाठी मराठा समाजाला पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार का?

(लेखात प्रसिद्ध केलेली मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत. या मताशी वृत्तवाहिनी संस्था सहमत असेलच असे नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *