हिंगणघाट तालुक्यात एकाच वेळी आठ मोरांचा मृत्यू झाल्यानं खळबळ

सध्या अनेक राज्यात बर्ड फ्लूची साथ सुरू आहे. शिवाय केरळ हरियाणा या सारख्या राज्यात अनेक कोंबड्या मारण्यात आल्या आहे. तर सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लूची साथ सुरू आहे त्यामुळे राज्यात भितीच वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वीच परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथे 800 कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाला होत आणि आता हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव दातार परिसरात आठ मोरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
तब्बल आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेनंतर पशुवैद्यकीय विभागाला देखील पाचारण करण्यात आले आहे. या मृत मोरांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर या मोरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. जोपर्यंत मोरांच्या मृत्यूचे कारण समोर येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे अवाहन वनविभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. राज्यात सध्या बर्ड फ्लूची साथ पसरत असल्याने, या मोरांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात सावधानी बाळगल्या जात आहे.