Mon. Sep 28th, 2020

‘मोगरा फुलला’ सिनेमाची 2 आठवड्यांत 4.17 कोटींची कमाई!

आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा ‘मोगरा फुलला’ सिनेमाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला श्राबणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. तीन दिवसांत या चित्रपटाने 1 कोटी 45 लाखांचा गल्ला जमवला होता. चित्रपटाने दुसऱ्या आठवडयातदेखील आपली घौडदौड कायम ठेवत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘कबीर सिंग’ सारख्या सिनेमाची जबरदस्त टक्कर असूनही ‘मोगरा फुलला’ सारखा हळवा सिनेमा मराठी प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरलाय.

17 जून ते 23 जून या दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने एकूण 2.72 कोटींची कमाई केली आहे. ‘मोगरा फुलला’ सिनेमाला एकूण मिळणारा प्रतिसाद बघता सिटी प्राईड चेन, ठाणे आणि मुंबई येथील थिएटरमधील चित्रपटाच्या शोंची संख्या वाढवण्यात आली. यामुळेच सिनेमालादेखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ‘मोगरा फुलला’ या सिनेमाची दोन आठवड्यांची एकूण कमाई 4.17 कोटी इतकी झाली आहे.

‘नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा’ या टॅगलाईनसह प्रदर्शित झालेला ‘मोगरा फुलला’ चित्रपटात स्वप्नील जोशी, सई देवधर, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, आनंद इंगळे, संदीप पाठक आदींच्या दमदार अभिनयाने नटला आहे.

नीना कुळकर्णी यांच्या रूपाने बऱ्याच काळाने हृदयाला भिडणारी आई पडद्यावर रसिकांना पाहायला मिळतेय, तर दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रकांत कुलकर्णी स्वप्नीलच्या काकाच्या भूमिकेत वेगळी छाप पाडून जातात.

‘पैशांनी श्रीमंत होणं सोप्पं, नात्यांनी समृद्ध होणं कठीण’ ही या सिनेमाची संकल्पना आहे. उत्तम कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, चांगली संकल्पना आणि सुमधुर संगीत यांच्यामुळे ‘मोगरा फुलला’ हा सिनेमा हिंदी सिनेमांच्या आव्हानांपुढेही टिकून राहतोय आणि सुपरहिट ठरतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *