अमित शहांनी उल्लेखलेल्या ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल माहितीच नाही, गृहमंत्रालयाची कबुली!

JNU मधील आंदोलनातून ‘तुकडे तुकडे गँग’ हा शब्दप्रयोग सर्वत्र चर्चेत आला. ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा या आंदोलनात दिल्या गेल्याच्या आरोपावरून भाजपचे तत्कालीन अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी JNU मधील डाव्या विचारसरणीच्या आंदोलकांसाठी पहिल्यांदा ‘तुकडे तुकडे गँग’ असं विशेषण वापरलं होतं. मात्र अशा प्रकारच्या कोणत्याच गँगच्या अस्तित्वाची माहितीच नसल्याचं स्पष्ट केलंय, ते ही गृहमंत्रालयानेच.
‘तुकडे तुकडे गँग’ नाहीच!
माजी पत्रकार व कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून (Right to Inform) केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तुकडे-तुकडे गँगविषयी माहिती विचारली.
तुकडे-तुकडे गँग’ कधी अस्तित्वात आली?
या गँगचे सदस्य कोण कोण आहेत?
त्याचे पुढारी कोण आहेत?
‘बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत या ‘तुकडे तुकडे गँग’वर बंदी का घातली जात नाही?
असे प्रश्न गोखले यांनी माहितीच्या अधिकारात विचारले होते.
मात्र त्यावर जे उत्तर आलं, ते फारच आश्चर्यजनक होतं.
‘तुकडे-तुकडे गँग’ विषयी कोणतीही माहिती नसल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्रालयाने केला.
तुकडे-तुकडे गँग अशा कोणत्याही कुख्यात टोळीबद्दल जर गृहमंत्रालयाच माहिती नाही, तर गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या माहितीच्या आधारे ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल विधानं केली? असा सवाल गोखले यांनी विचारला आहे. जर तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नसेल, तर त्याचा अर्थ गृहमंत्र्यांनी चुकीची वक्तव्यं करून जनतेची दिशाभूल केली आहे आणि त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही गोखले यांनी केली आहे. असं न केल्यास आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असंही साकेत गोखले यांनी स्पष्ट केलं आहे.