मनसेची नवी योजना, ‘बांग्लादेशी दाखवा, 5000 मिळवा’

बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम उघडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता नवीन योजना सुरू केली आहे. ‘बांग्लादेशी दाखवा, पाच हजार मिळवा’ अशी योजनाच औरंगाबादमध्ये मनसेने केली आहे. या ठिकाणी मनसेतर्फे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. परिसरात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या पाकिस्तानी, बांग्लादेशींची माहिती नागरिकांनी या स्टॉल्सवर दिल्यास त्यांना बक्षिसं दिली जाणार आहेत.
परिसरातील नागरिकांना नव्याने राहायला येणारे रहिवाश्यांची बऱ्यापैकी माहिती असते. तसंच हे रहिवासी कुठले असावेत, याचीही माहिती बऱ्याचदा नागरिकांना उपलब्ध होत असते. त्यामुळे अशा नागरिकांनाच मनसेतर्फे आवाहन करण्यात आलंय. या नागरिकांनी पुढे येऊन आपल्या परिसरातील बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना 5 हजार रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलंय.
9 फेब्रुवारी रोजी मनसेच्या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांग्लादेशी घउसखोरांना हुसकावून लावण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना दिल्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोहीम उघडली. मनसेच्या प्रयत्नांमुळे मुंबईच्या विरार येथील अर्नाळा परिसरातून 23 बांग्लादेशींना अटक करण्यात आलं होतं. बोरिवली येथेही बांग्लादेशी घुसखोरांविरोधात आंदोलन करण्यात आलं. ठाण्यात तीन बांग्लादेशी कुटुंबं पकडण्यात आली. पुण्यामध्ये मात्र हे आंदोलन मनसे कार्यकर्त्यांवरच उलटलं होतं. पुण्यात बांग्लादेशी समजून ज्या व्यक्तींना हाकलून देण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला, ते प्रत्यक्षात पश्चिम बंगालहून आलेले मुस्लिम होते. त्या व्यक्तींनी तक्रार केल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल झाला.