Mon. Oct 25th, 2021

मनसे-भाजपचा आंब्यांवरून राडा… थांबेल का?

ठाणे महापालिकेने मनसेच्या आंबा स्टॉलला दिलेली परवानगी नाकारली असून, त्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत, तशी नोटीस देखील बजावली आहे.  यावर मनसे पुन्हा आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. मनसे 17 तारखेला ठाण्यात मोठा मोर्चा काढणार आहे. मोर्चामध्ये राज ठाकरे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मोर्च्यात संपूर्ण ठाण्यातील शेतकरी आंबा विक्रेते आणि मनसे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हा मोर्चा महापालिका प्रशासन आणि भाजपा विरोधात काढला जाणार आहे.

काय होतं प्रकरण?

आंबा विक्रेता स्टॉलवरुन काल रात्री ठाण्यात मनसे भाजपा मध्ये तुफान हाणामारी झाली. त्यानंतर आज मनसेनं आंबा विक्रेता स्टॉलकरता रीतसर परवानगी घेतल्याचा दावा केलाय. ढोलताशांच्या गजरात पेढे वाटत पुन्हा स्टॉल उभा केला.

एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आणि प्लास्टिकच्या बाटल्यांची फेकाफेकी करत 9 मे रोजी रात्री आंब्याच्या एका स्टॉलवरुन मनसे आणि भाजपामध्ये चांगलाच राडा झाला. हा राडा कमी की काय म्हणून आता सर्व परवानग्या रीतसर घेतल्याचा दावा करत मनसेनं पुन्हा आज आंबा विक्रेता स्टॉल लावलाय.

भाजपाचं पुन्हा मनसेला आव्हान

मनसे साफ खोटं बोलत असून त्यांना पालिकेने परवानगी दिलीच नाही, त्यांचा स्टॉल अनधिकृतच आहे, त्याविरोधात पुन्हा भाजपा स्टाईल उत्तर दिले जाईल असं भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी स्पष्ट केलंय.

आरोप-प्रत्यारोप!

फक्त हाणामारी पर्यंत आंबा राजकारण थांबले नसून आता स्टॉल लावण्याकरता 20 हजार रुपये दिले नाही म्हणून भाजपाने हे राजकारण केल्याचा आरोप स्टॉल धारकाने केलाय.

ज्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या विरोधात हे आरोप केले गेलेत त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत.

राज्याचे राजकारण कधी कोणत्या कारणावरून पेटेल याचा नेम नाही मात्र अशा प्रकारे निवडणुका तोंडावर आल्या की असा राडा करुन या राजकीय पक्षांना काय मिळतं?  या राड्यामुळे ठाणेकरांना काय मिळालं याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *