एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची परीक्षार्थ्यांची मागणी

राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोलन करणारे विद्यार्थी आता ११ एप्रिलची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहीजण अंगावर दुखणे काढत आहेत. परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत एमपीएससीने १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात परीक्षार्थींनी राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय बदलत २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. तसेच पुढील परीक्षा नियोजित वेळेत होतील, असे स्पष्ट केले.
एमपीएससीची २१ मार्चची परीक्षा वेळेत झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ११ एप्रिलला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत. त्यातच पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या विद्यार्थ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला आहे.