Mon. Sep 20th, 2021

मुंबईतील कोरोना नियंत्रणात असल्याची पालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली असून दैनंदिन रुग्णसंख्या बुधवारीही हजाराच्या खालीच राहिली आहे. बुधवारी ८३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १३०० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

कोरोनाने बुधवारी आणखी ११ रुग्ण दगावले असून आतापर्यंत मुंबईत या संसर्गाने १५ हजार २२७ रुग्णांचा बळी घेतला आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोना स्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे मुंबई महापालिकेच्या वतीने बुधवारी उच्च न्य़ाय़ालयात सांगण्यात आले आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९५ टक्के इतके आहे तर कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के इतका आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी आता ७२७ दिवसांवर गेला आहे.

मुंबईतील कोरोना आकडेवारी (बुधवार):

कोरोनाबाधित रुग्ण – ८३०
बरे झालेले रुग्ण – १३००

आतापर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण – ६८६१२४
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १४,९०७
दुपटीचा कालावधी- ७२७ दिवस
कोरोनावाढीचा दर ( ९ जून ते १५ जून) – ०.०९ %

उच्च न्यायालयात महापालिकेची माहिती

मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाबाबत महत्त्वाची माहिती दिली. मंगळवारच्या आकडेवारीचा तपशील उच्च न्यायालयात देण्यात आला. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे फक्त ५७५ नवीन रुग्ण आढळले. तसेच परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असून रुग्णालयांतील खाटांचे नियोजनही पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *