मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असलेल्या प्रदीप नंदराजोग हे २३ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर न्या. भूषण धर्माधिकारी यांना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची अधिसूचना मंत्रालयाने जारी केली होती.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्या. धर्माधिकारी यांना मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची शिफारस केली होती. यानुसार केंद्र सरकारने आज बुधवारी त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली.
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानुसार, केंद्रीय विधि आणि न्याय मंत्रालयाने या नियुक्तीसंदर्भात बुधवारी अधिसूचना प्रसिद्ध केली.
न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचा अल्पपरिचय
- भूषण धर्माधिकारी यांचा जन्म २० एप्रिल १९५८ रोजी नागपुरात झाला होता.
- नागपूर विद्यापीठातून त्यांनी १९७७ ला बीएससी आणि १९८० ला कायद्याची पदवी प्राप्त केली.
- नागपूर उच्च न्यायालयातून १९८० मध्ये भूषण धर्माधिकारी यांनी वकिलीला सुरूवात केली.
- राज्य सरकारच्या महामंडळांवर तसेच उद्योग, कर्मचारी संघटना यांचे खटले कामगार न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत लढवले.
- मुंबई उच्च न्यायालयात ते अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून १५ मार्च २००४ ला विराजमान झाले. तर, १२ मार्च २००६ रोजी न्यायमूर्ती झाले.