Fri. May 20th, 2022

तौत्के चक्रीवादळासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तौक्ते चक्रीवादळ तयार झालं असून ते महाराष्ट्राच्या किनारी भागाला समांतर असा प्रवास करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी आणि तीव्र वादळ असणार आहे. रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई महानगर पालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. ‘मुंबई महानगर पालिकेची यंत्रणा सज्ज केली आहे. योग्य त्या सर्व उपाययोजना करून ठेवल्या आहेत’, असं महापौर म्हणाल्या. चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लसीकरण पुढचे दोन दिवस बंद राहणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईत प्रभाव जाणवल्यास त्यासाठीच्या पूर्व उपाययोजना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. यामध्ये समुद्र किनाऱ्यांलगतच्या जागा निर्मनुष्य केल्या आहेत. एनडीआरएफ, नेव्ही, अग्निशमनच्या तुकड्या तिथे पोहोचल्या आहेत. कदाचित या वादळाचा तडाखा मुंबईला बसणारच नाही. ते वादळ मुंबईकडे आलंच, तर सौम्य होऊन येईल. पण ज्या ठिकाणी पाणी शिरू शकतं, तिथे पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईच्या सहा चौपाट्यांवर आपातकालीन मदत पथके तैनात करण्यात आली आहेत. विजेच्या तारांचा प्रवाह देखील खंडित केला आहे’, अशी माहिती महापौरांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.