Mon. Dec 6th, 2021

कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अँलर्ट

देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर या आठवड्यामध्ये कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट कायम आहे. रत्नागिरीमध्येही मंगळवार ते गुरुवार या कालावधीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा येथे घाट परिसरात सोमवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे जिल्ह्यामध्ये घाट परिसरात बुधवारी आणि गुरुवारी तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र पुढच्या दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवून हवामान खात्याने संपूर्ण कोकण परिसरासाठी ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, राजापूर, लांजा परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांमध्ये सोमवार सकाळपासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. अधूनमधून विश्रांती घेऊन पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी सकाळपासून विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. पावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे शेतीच्या कामांना गती मिळाली आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वत्र आज तुरळक पाऊस झाला. मात्र या पावसाच्या संततधारेमुळे अलिबाग- मुरुड रस्त्यावरील आर्च पद्धतीने बाधंकाम करण्यात आलेला पुल कोसळला. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली. प्रशासनाने या मार्गावरील वाहनांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचा सूचना केल्या. तसेच जिल्ह्यातील कुडंलिका, आंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी, उल्हास या नद्यांच्या पाण्याची पातळी सध्यातरी ‘इशारा पातळी’पेक्षा कमी आहे. जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी आहे. मात्र पावसाचा जोर वाढण्याच्या पार्श्वभूमीवर नद्यांच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा सूचना करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *