Sat. Jan 22nd, 2022

काय आहे कोल्हापुरातील मटणाचा वाद?

कोल्हापुरात पिढ्यान पिढ्या विश्वासाने सुरू असलेल्या मटण व्यवसायावर सध्या दरवाढीच्या वादाचे सावट पसरलं आहे. त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील संबंध ताणले गेलेत. त्यातून गेल्या नऊ दिवसापासून कोल्हापुरातील मटण विक्री ठप्प झालीय.

मटण आणि तांबडा पांढरा रस्सा म्हणजे कोल्हापूरकरांचा जीव की प्राण… कोणीही पै-पाहुणे, मित्रपरिवार येऊ देत, कोल्हापुरातील पाहुणचाराचा पहिला बेत म्हणजे मटण. मात्र याच मटणाची चव कोल्हापूरकरांना सध्या चाखता येत नाहीय. मटण दरवाढ विरोधी कृती समिती आणि मटण विक्रेते यांच्यात दरावरून सुरू असलेल्या वादात मटण विक्रीच बंद झाल्याने नेहमी गजबजलेल्या मटण मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.

काय आहे वाद ?

मटणाच्या या वादाची ठिणगी नोव्हेंबर महिन्यात गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे राहत असलेल्या कसबा बावड्यात पडली.

शहराबाहेर 400 ते 450 रुपये किलोने मिळणारे मटण शहरात मात्र 560 ते 600 रुपये या दराने मिळत असल्याने संतापलेल्या ग्राहकांनी थेट बावड्यातील दुकानेच बंद पाडली.

हे लोण हळूहळू शहरात पसरले.

त्यातून मटण विक्रेते आणि दरवाढ विरोधी कृती समिती आमने सामने आली.

जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा यावर तोडगा काढणायसाठी समिती नेमावी लागली.

त्यातून झालेल्या बैठकीतून 480 रुपयांवर तोडगा निघाला.

मात्र, बाजारातील बकऱ्यांच्या दराचा मुद्दा पुढे करत विक्रेत्यांनी हा दर फेटाळला.

त्यातून चिघळलेल्या वादात अन्न प्रशासनाला कारवाईसाठी दरवाढ कृती समितीने भाग पाडलं.

31 डिसेंबरलाच सर्वधिक गर्दीच्या दिवशी कारवाईचा बडगा उगरल्याने अखेर मटण विक्रेत्यांनी दुकानेच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

तर दर्जेदार मटण मिळावे हा आमचा अधिकार असून अन्न विभागाने विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी दरवाढ विरोधी कृती समितीने केली त्यातून आता नवा वाद निर्माण झालाय.

विक्रेते आणि दरवाढ कृती समिती यांच्या वादात मात्र ग्राहकांची चांगलीच अडचण झाली आहे.

दोघांच्याही मागण्या रास्त आहेत. मात्र या मुळे आम्हाला पाहुण्यांचा पाहुणचार,पार्ट्या करता येत नाही याचा विचार करणार असा सवाल आता सामान्य कोल्हापूरकर करत आहे.

कोल्हापूरच्या मटणाचा हा वाद दारावरून सुरू झाला असला, तरी तो आता अविश्वासापर्यंत पोहचला आहे. केवळ फोनवर बोलून कोणाकडून तरी डबा पाठवून मटण घरी विश्वासाने मटण ज्या विक्रेत्याकडून आणलं जात होतं, त्यावरच आता अविश्वास निर्माण झालाय. त्यामुळे कोल्हापूरचे मटणच आता अडचणीत सापडले असून यावर मार्ग कोण काढणार आणि मटणाचे तुकडे कधी ताटात पडणार हेच पाहणे महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *