Thu. Mar 4th, 2021

बिरबलाच्या ‘या’ किल्ल्याचं रहस्य आजही गूढच

भारतातील विविध गडकिल्ले आपलं वैशिष्ट्यं राखून आहेत. अनेक किल्ल्यांवर घडलेला इतिहास आजही आपल्याला रोमांचित करतो. मात्र अनेक किल्ल्यांची रहस्यं मात्र अद्याप गूढच राहिली आहेत. ती उलगडण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्याचे विपरीत परिणाम घडून आले आहेत.

असाच एक किल्ला आहे बुंदेलखंडातील कलिंजर किल्ल्याचं. हा किल्ला म्हणजे एक गूढ हवेलीप्रमाणे आहे. 10 व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्यावर आजही अशा काही घटना घडतात, की त्यामुळे या किल्ल्यावर कुणी रात्री थांबण्याची हिंमत करत नाही.

किल्ल्याचा इतिहास

या किल्ल्यावर चंदेल राजपूत, सोलंकी घराण्यांनी राज्य केलं होतं. त्यानंतर गझनीचा मेहमुद, कुतुबुद्दिन ऐबक, शेरशहा सुरी, हुमायून यांनी हल्ला करून हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता. याच किल्ल्यावर तफेच्या गोळ्यामुळे शेरशहा सुरी मृत्यूमुखी पडला. कालांतराने बादशाह अकबराने हा किल्ला जिंकला आणि आपला हजरजबाबी वजीर बिरबल याला भेट दिला.

किल्ल्याचं रहस्य

कलिंजर किल्ल्यामध्ये अनेक रहस्यं कैद असल्याचं सांगण्यात येतं. हा किल्ला 800 फूट उंच डोंगरावर बांधण्यात आलाय. या किल्ल्याच्या खांबावर एका गूढ लिपीमध्ये संदेश लिहिलेले असून त्यांचा अर्थ अद्याप समजलेला नाही. तसंच या किल्ल्यात विविध गुहा आहेत. या किल्ल्यातील एका गुहेला सीता शेज म्हणतात. येथील दगडी पलंग आणि उशीवर रामायणकाळात सीता विश्रांती घेत असे, असं सांगितलं जातं. या किल्ल्यावर गुप्त खजिना लपवण्यात आला असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र हा खजिनाही अद्याप कुणाला शोधून काढता आलेला नाही. या किल्ल्यावर 7 वेगवेगळे दरवाजे आहेत. मात्र यांची रचना एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळी आहे. एकाच किल्ल्याचे दरवाजे विविध रीतीने बांधल्यामुळे हे दरवाजे नेमके काय इशारा करतात, याचा उलगडा झालेला नाही.    

किल्ल्यावरील गुप्तकालीन मंदिरं

या किल्ल्यावर गुप्तकालीन मंदिरं आहेत. येथील शिवमंदिराला नीळकंठ मंदिर म्हटलं जातं. विषप्राशन केल्यावर महादेव शंकराने या ठिकाणी तपश्चर्या करून अंगाचा दाह शांतवल्याची कथा आहे. कायम पाण्याचा दुष्काळ असणाऱ्या या भागातही निलकंठ मंदिरातील महादेवावर एका नैसर्गिक प्रवाहाद्वारे सतत पाण्याचा अभिषेक होत राहतो. हा एक नैसर्गिक चमत्कारच असल्याचं मानलं जातं.

रात्री मात्र किल्ल्यावर

या किल्ल्याची रचना आणि बांधकाम अतिशय सुंदर असल्यामुळे अनेक पर्यटक दिवसा हा किल्ला पाहायला येतात. रात्री मात्र या किल्ल्यापासून लोक दूर राहणंच पसंत करतात. रात्री हा किल्ला भीषण रूप धारण करतो. या किल्ल्यातील राणी महालातून रात्री घुंगरांचे आवाज थेट खालच्या गावांपर्यंत येतात. हे नेमके कुणाच्या घुंगरांचे आवाज आहेत, हे शोधून काढायचा प्रयत्न झाला. मात्र कुणालाही अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *