Wed. May 18th, 2022

नगरपंचायत निवडणूक २०२२ निकाल : निवडणुकीत कोण विजयी?

वैराग नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विजयी

बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने चार जागांवर विजय मिळवला आहे. मात्र वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खाते उघडले नाही.

वाशी नगरपंचायत भाजपच्या ताब्यात

वाशी नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप विजयी झाला आहे. भाजपने १० जागांवर वर्चस्व मिळवले असून शिवसेना ७ जागांवर विजयी झाले आहेत.

देहूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दणक मिळाली आहे.

संग्रामपूरमध्ये नगर पंचायतीमध्ये प्रहारची जोरदार मुसंडी पाहायला मिळाली असून १७ पैकी १२ जागांवर विजयी झाला आहे.

उस्मानाबादमध्ये वाशी नगरपंचायत भाजपच्या ताब्यात

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आले असून भाजपला १० जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला ७ जागा मिळाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी नगरपंचायत निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धूळ चारत विजय मिळवला आहे. शिवसेना नेते प्रशांत चेंडेना धक्का देत १७ पैकी १० जागा जिंकत भाजपने या निवडणूकीत विजय मिळवला आहे.

कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश

कर्जत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १२ जागांवर विजयी झाला असून काँग्रेसने ३ जागांवर बाजी मारली आहे. तर भाजपला २ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत नगर पंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता  

कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १० जागांवर रोहीत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे.

‘हा कवठेमहांकाळमधील सर्वसामान्य माणसांचा विजय आहे. पअक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला आशिर्वाद आणि मार्गदर्शन केले, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली आहे. तसेच पक्षासोबत कोणी राहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

भातकुली नगरपंचायतीवर युवा स्वाभिमानी पक्षाची सत्ता

भातकुली नगरपंचायतीमध्ये युवा स्वाभीमान पक्ष विजयी झाला आहे. भातकुली नगरपंचायतीमध्ये १७ जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली असून युवा स्वाभिमान पक्षाने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना ३ जागा, भाजपला २ जागा, अपक्षला २ जागा आणि काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सर्वाधिक ९ जागा मिळाल्यामुळे भातकुली नगरपंचायतवर रवी राणा यांचे वर्चस्व कायम असणार आहे.

नायगाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व

नांदेड जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. नायगाव नगरपंचायतीमध्ये १७ जागांवर निवडणूकप्रक्रिया पार पडली असून १७ पैकी १७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, भाजपला एकही जागा मिळाली नाही.

जळगाव बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

जळगाव बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. बोदवड नगरपंचायमीमध्ये १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून शिवसेनेने एकूण ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ७ तर भाजप १ जागेवर निवडून आली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरूंग लागला असून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी चमत्कार घडवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.