नागपुरमध्ये निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधींची रोकड जप्त
नागपुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चारचाकी वाहनातून 1 कोटी 1 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक तोेंडावर येऊन ठेपली आहे. यामुळे राजकारणात अनेक घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत. अशीच एक घटना नागपुरमध्ये उघडकीस आली आहे. नागपुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चारचाकी वाहनातून 1 कोटी 1 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही रक्कम जप्त केली आहे.
पहिली कारवाई मध्य नागपुरातील पाचपावली परिसरात केली असून जिल्हा निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांनी एका कार मधून 71 लाख आणि 5 लाख अशी एकूण 76 लाखांची रोकड जप्त केली आहे. कारच्या डिक्कीमध्ये ही रोकड एका पेटी मध्ये ठेवण्यात आली होती.
तर दुसरी कारवाई रेल्वे स्टेशन जवळील मानस चौक जवळ करण्यात आली. संध्याकाळी सीताबर्डी पोलिस स्टेशनचे पथक वाहनांची तपासणी करताना एका ओला कार मधून 25 लाखांची रोकड हस्तगत झाली. ओला मध्ये प्रवास करणारे प्रवासी त्या रकमेबद्दल पोलिसांना समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.
त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम निवडणूक अधिकारी आणि आयकर अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहे. दोन्ही प्रकरणात सध्या चौकशी सुरू असून रोकड कोणाची आहे, कुठे नेण्यात येतं होती याची माहिती अधिकारी घेत आहेत.