नाना पटोलेंचा दावा पोलिसांनी फोल ठरवला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे नाना पटोले यांच्या वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे. पटोलेंच्या विरोधात राज्यात आंदोलन करण्यात आली. दरम्यान परिस्थिती सावरण्यासाठी ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाही, तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोललो होते’, असे नाना पटोलेंनी सांगितले. तसेच या गावगुंड मोदीला पोलिसांनी अटक केली असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. मात्र, नाना पटोलेंचा दावा पोलिसांनी फोल ठरवला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये वक्तव्य केले की ‘मोदी’ नावाच्या गावगुंडाला भंडारा जिल्ह्यातील पालादूर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र पोलिसांनी कुठल्याही मोदी नावाच्या व्यक्तीला अटक केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘पोलिसांनी मोदी नावाच्या गुंडाला पकडले असून त्याचा जबाब घेणे सुरू आहे. मात्र भाजप मूळ मुद्याला बगल देण्यासाठी अर्थाचा अनर्थ करत आहेत. पंतप्रधान हे एका पक्षाचे नसून ते देशाचे असतात हे आम्हाला माहित आहे.’
भंडारा पोलिसांनी नाना पटोले यांचा दावा फोल ठरवला असून पोलिसांकडून गुंडाचा शोध सुरूच आहे. नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच याप्रकरणी चौकशी सुरू झाली असून अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे भंडारा पोलिसांनी सांगितले आहे.