नानांच्या वक्तव्याची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी मागितला अहवाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. ‘मोदीला मी मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केले. त्यामुळे पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अहवाल मागितला असून पटोलेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची आता चौकशी होणार आहे.
नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपाने राज्यभरात आंदोलने केली तर पटोले यांच्याविरोधात पोलिसांत ठिकठिकाणी भाजपकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप पटोले यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे भाजपने अनेक ठिकाणी आंदोलने केली आहेत तर आंदोलनाच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था मोडल्याच्या आरोपामुळे भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि अतुल भातखळकर यांना त्यांच्या आंदोलनस्थळावरून ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, पटोले यांच्यावर बोलताना माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांची जीभ घसरली. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार करण्याची मागणी केली आहे.