Mon. Jan 17th, 2022

मेळघाटात निसर्गाचा अद्भुत चमत्कार, बोअरवेलमधून पाणी संततधार

निसर्ग म्हणजे चमत्कारांचं आगरच. तो कधी कोणत्या रूपात चमत्कार घडवेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळ असताना, अनेक ठिकाणी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना मेळघाटात मात्र निसर्गाने वेगळीच कृपा केली आहे. मेळघाटातील करी गाव येथे वनविभागाने तयार केलेल्या बोअर वेलमधून गेल्या आठवड्याभरापासून दर दिवसाला 16 लाख लिटर पाणी अखंड बाहेर येतंय. आश्चर्य म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रिक पंपाचा वापर होत नसताना हे पाणी पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बाहेर येतंय आहे.

काय आहे नेमका हा चमत्कार?

मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पांतर्गत नवनिर्मित वन्यजीव विभागात करी गाव येतं.

येथे वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी वनविभागातर्फे पाणवठा आणि बोअरवेल तयार करण्याचं ठरलं.

त्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अमरावतीमधील भूवैज्ञानिक श्रीपाद टोहेरे यांनी स्थळ निश्चित केलं.

या ठिकाणी सात दिवसांपूर्वी बोअरवेलचं काम सुरू करण्यात आलं.

या भागात मुबलक पाणी असण्याचा अंदाज होताच. त्यानुसार 100 फुटांवर पाणी लागलं.

नियमांनुसार 250 फूट बोअरवेल करण्यात आली.

मात्र यावेळी निसर्गाने आपली किमया दाखवून दिली.

बोअरवेल मधून इलेक्ट्रिक मोटरचा वापर न करता पाणी आपोआप जमिनीवर येत असल्याचं त्यांना दिसलं.

आर्टिशन प्रकारच्या या बोअरवेलची क्षमता तपासली.

ती 7 इंच म्हणजेच जवळपास 64750 लिटर्स प्रती तास इतकी असल्याचं आढळलं.

या बोअरवेल मधील पाण्याचे नमुने आता संकलित करण्यात आले आहेत.

अमरावतीच्या विभागीय प्रयोगशाळेत या नमुन्यांची रासायनिक तपासणी होणार आहे.

या बोअरवेल मधून दररोज 15 लाख 45 हजार लिटर इतकं पाणी बाहेर येतंय.

या पाण्यातून दर दिवसाला अंदाजे 38 हजार लोकांची तहान भागू शकते.

निसर्गाचीच किमया!

महाराष्ट्रात पाणीप्रश्न गंभीर होत असताना असा प्रकारे पाण्याचा अखंड स्रोत आढलून आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय. वन्यजीवांच्या तहानेवर आणि या भागातील रहिवाशांच्या समस्येवर निसर्गानेच काढलेला हा उपाय निसर्गाच्या महानतेचीच साक्ष देतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *