साडेतीन शक्तीपीठ पैकी दुसरे पीठ- श्री रेणुकामाता (माहूरगड)

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असल्याचे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.
माहूरची रेणुका आई ही शिखरावर विराजमान आहे. डोंगराच्या पायथ्याशी माहूर हे गाव आहे. डोंगरावरून गावातच स्वरूप अगदी मनमोहक दिसून येतो. या परिसरात मोठे तीन शिखर आहे. यावर दत्तात्रय महाराज अनुसया माता तसेच रेणुका आई विराजमान आहे. प्रत्येक शिखरावर भाविक हजेरी लावतात आणि देवी देवतांचे दर्शन घेतात. या उंच शिखरावरून मनमोहक दृश्य दिसून येते. वर आकाशात पहिले असता आकाश जणू आपल्या मुठीत येणार असा भास होतो अगदी जवळून जाताना दिसतात.
शिखरावर चढत असताना दोन्ही बाजूने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहे. बेल फुल, पेढा तसेच रेणुका आईला, नऊवारी साडी, बांगडी, खेळणे तसेच विविध वस्तूंची दुकानं आहेत.
दर्शनाला येणाऱ्या भाविकांमुळे पर्यटनस्थळ बनलेल्या माहूरच्या स्थानिक परिसरातील नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न मिटलेला दिसून येतो.
विविध व्यवसाय करून नागरिक आपली उपजीविका भागवतात.
सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांतून भाविक येथे लाखोंच्या संख्येने येतात आमि मातेचे दर्शन घेतात.
नागरिक कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन तसेच मंदिर प्रशासन मार्फत योग्य ती सेवा पुरविल्या जातात.
देवीची आख्यायिका
देवीची आख्यायिका अशी आहे की माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला.
तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले.
शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले.
जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत.
सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती.
राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली.
ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही.
तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, ही संधी साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला.
आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली.
नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला.
घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली.
पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले.
रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला.
तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ‘इथेच पित्यावर अग्नीसंस्कार कर’ असे सांगितले.
परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले.
या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले.
यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले.
त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ‘तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस.’
परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते.
परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘ मातापूर ‘ म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ ऊर ‘ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले..!!