Sun. Apr 18th, 2021

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून महाराष्ट्रातील महामार्गांसाठी भरघोस निधी जाहीर

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील महामार्गांसाठी भरघोस निधी जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील रस्ते मार्गांचं जाळं अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्यातील विविध महामार्गांच्या कामांसाठी हा निधी घोषित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. गडकरींनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

यानुसार, पुणे जिल्ह्यातील एनएच ५४८-डीडी वर कात्रज जंक्शनवर सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी १६९.१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सोलापूर विजापूर रोड एनएच ५२ वर २ लेन ते ४ लेनच्या पुनर्वसन आणि अपग्रेडेशनसाठी अंदाजे एकूण लांबी ३.३९० किमी, २९.१२ कोटी निधी मंजूर झाला आहे. तसेच, पूर्णा नदीवर दोन पदरी पुलांच्या कामासाठी आणि शेगाव- देवरी फाटा एनएच ५४८ सी च्या कामासाठी ९७.३६ कोटी निधी मंजूर झाला आहे.
याशिवाय ठाणे जिल्ह्यातील कल्याण-निर्मल रस्ता एनएच ६१च्या दोन लेनचे काँक्रिटीकरण, रुंदीकरणासाठी ४७.६६ कोटी आणि गुहागर- चिपळून-कराड रोड एनएच १६६ ई च्या मजबुतीकरणासाठी १६.८५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.डीबीएफओटी पीपीपीवरील सिन्नर ते नाशिक विभागातील एनएच ५० ते फोर लेनच्या विकासासाठी ३.१३ कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. याशिवाय अनेक मार्गांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी केंद्रीय रस्तेबांधणी आणि राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते विकासासंदर्भात घोषणा केल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रसह आसाम, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसाठी तसेच, लडाखच्या केंद्रशासित प्रदेशासाठी निधी जाहीर करण्यात आला . महाराष्ट्रासाठी २७८० कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती गडकरी यांनी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *