मांसाहारींसाठी आनंदाची बातमी, अंडी, कोंबडी आणि मटण विक्रीला परवानगी

मांसाहारींसाठी लॉकडाऊनदरम्यान चांगली बातमी आहे. राज्य सरकारने अंडी, कोंबडी आणि मटण विक्रीला परवानगी दिली आहे. तसंच जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेल्सची किचन सुरू राहणार आहेत. मात्र हॉटेलमध्ये बसून खाण्याची सुविधा नाही. हे पादर्थ घरपोच पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. तरीही हे खाद्यपदार्थ बनवणाऱ्या आणि त्याची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. राज्यात ताळेबंदीदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानं चोवीस तास सुरू ठेवायची परवानगी आता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यानंतर हॉटेल्सची किचन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे.
मांस तसंच चिकनमुळे कोरोनाची लागण होते अशा समजातून लोकांनी मांसाहराकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे राज्यात मांसविक्रेत्यांवर तसंच पोल्ट्रीफार्म्सवर वाईट दिवस आले आहेत. मात्र आता राज्यात अंडी, कोंबड्या, मासे आणि मटण यांची विक्री खुली करण्यात आली आहे. मात्र मांस विक्री आणि खरेदी करणाऱ्यांनी ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये, यासाठी स्वच्छता बाळगण्याची गरज आहे. खरेदीसाठी गर्दी करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. याशिवाय आबे, द्राक्षं, केळी, कलिंगड, संत्री या फळांची विक्रीदेखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
“राज्यातील शेतकरी कर्जमाफी अंमलबजावणी थांबवण्यात आलेली नाही. शासकीय यंत्रणा सध्या कोरोना प्रतिबंधाच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या कामात काहीसा संथपणा आला आहे. साखर कारखान्यात गाळपाचा ऊस आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र ऊसतोड मजुरांच्या जेवणाची व्यवस्था संबंधित कारखान्यांनी घ्यायची आहे.” असंअजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.