Sat. Aug 15th, 2020

ब्राह्मण संघटनांच्या विरोधानंतर मराठा संघटनांचा चंद्रकांत पाटील यांना विरोध

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. युतीच्या जागा वाटप झाल्या. पुणे शहरातील आठही जागा युतीत भाजपकडे आल्या. यामध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू आहे ती म्हणजे कोथरूड विधानसभा मतदारसंघाची… कारण या ठिकाणी भाजपने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी या डावलून महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी घोषित केली. उमेदवारी घोषित केल्यापासून चंद्रकांतदादा पाटील यांना अगोदर ब्राह्मण संघटनांनी विरोध केला. तर आता मराठा क्रांती मोर्चानेही कोथरूडमध्ये त्याच्या उमेदवारीला विरोध केला.

ब्राह्मण संघटनांचा विरोध

ब्राह्मण संघटनांचा विरोध मेधा कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने मावळला.

त्यांच्या काही अटीशर्ती तत्त्वतः मान्य करून चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूडमध्ये ब्राह्मण संघटनांनी पाठींबा दिला.

कोथरूड तसा शिवसेना-भाजपसाठी सेफ असलेला मतदारसंघ.

पण 2014 ला मोदी लाटेत मेधा कुलकर्णी निवडून आल्या.

कोथरूड तसा ब्राह्मण जास्त मतदार असलेला मतदारसंघ.

बाकी समाजाचे मतदार असले तरीही हा मतदारसंघ ब्राह्मणबहुल आहे.

यामुळे मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती.

पण तसे न झाल्याने या मतदारसंघात चार ब्राह्मण उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

त्यामुळे कदाचित ब्राह्मण संघटना विरोध करत होत्या. पण त्याचा विरोध मावळला.

मराठा संघटनांचा विरोध

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून राज्यात 58 मूकमोर्चे निघाले.

त्यानंतर दोन ठोक मोर्चे काढले.

तसेच विद्यार्थ्यांसाठी शेकडो आंदोलनं केली.

मात्र सरकारने समाजाची दिशाभूल करीत एकही मागणी मान्य केली नाही.

मराठा समाजाच्या मागणीसाठी राज्य सरकारने एक उपसमिती स्थापन केली.

याच्या अध्यक्षपदी चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्त केली होती.

पण 3 वर्षांत एकही मागणी मान्य केली नाही. बोगस शासन निर्णय काढून समाजाची फसवणूक केली, असा आरोप मराठा महासंघाने केलाय. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यत चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूडमध्ये विरोध असेल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघ तसा भाजपला अवघड जाणार नाही. मात्र ब्राह्मण महासंघाच्या मागण्या आणि मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या मान्य न होण्याला गेले पाच वर्षे सरकारमध्ये असलेले मंत्री चंद्रकांतदादा पाटील जबाबदार असल्याचं दोन्ही संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून विरोध होत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *