Mon. May 17th, 2021

प्राणवायूचा तुटवडा दूर करण्यासाठी प्राणवायू प्रकल्पांची निर्मिती

मुंबई: राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने १२ रुग्णालयांच्या आवारामध्ये प्राणवायू निर्मितीचे १६ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांमध्ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमध्ये एकूण ४३ मेट्रिक टन प्राणवायू निर्माण करता येणार आहे.
देशभरातील रुग्णालयांकडून प्राणवायूची मागणी प्रचंड वाढली आहे. प्राणवायू उत्पादक, वाहतूकदारांची क्षमता आणि मर्यादा लक्षात घेऊन प्राणवायू मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मुंबईतील रुग्णांना प्राणवायूची कमतरता पडू नये यासाठी पालिकेने आता आपल्या रुग्णालयांच्या आवारातच प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकल्प किमान १५ ते कमाल ३० वर्षे संचालित होऊ शकतात.

शहरातील प्राणवायूची मागणी लक्षात घेत १२ रुग्णालयांमध्ये १६ प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने लघू ई-निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेशास मंजुरी मिळताच एका महिन्यात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.या १६ प्रकल्पांचा अंदाजे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *