ब्रिटनमधून दीड हजार प्रवासी मुंबईत
२१ डिसेंबरनंतर जे प्रवासी आले त्यांना विलगीकरणात ठेवले जात आहे

ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या संकरावतारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ नोव्हेंबरपासून किती प्रवासी इंग्लंडहून आले त्याचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानुसार मुंबईत या काळात सुमारे दीड हजार प्रवासी ब्रिटनमधून आले असल्याचे आढळले आहे. पालिकेने त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या महिन्याभरात लंडनहून मुंबईत आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व महापालिकांना दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिके नेही अशा सर्व प्रवाशांना आवश्यक ती काळजी घ्यावी आणि करोनाची लक्षणे जाणवल्यास तत्काळ पालिकेच्या वॉर रुमशी संपर्क साधावा, करोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले होते.
२१ डिसेंबरनंतर जे प्रवासी आले त्यांना विलगीकरणात ठेवले जात आहे. मात्र त्यापूर्वी आलेल्या व घरी गेलेल्या प्रवाशांना संपर्क साधला जात आहे. कोणाला लक्षणे जाणवली होती का ताप येऊन गेला का याची माहिती घेतली जात आहे. एखाद्याला ताप येऊन गेला असेल तरी त्याच्या निकट संपर्कातील लोकांच्या तपासण्या, चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर जे प्रवासी गेल्या १५ ते २० डिसेंबर या कालावधीत आले आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे लागणार असून त्यांचा पाठपुरवाा करण्याचे आदेश दिले असल्याचेही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.