‘अमरावतीत दंगल कोणी पेटवली हे जनतेला माहिती आहे’ – संजय राऊत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आहेत. त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर त्याचे पडसाद म्हणून अमरावती शहरात हिंसाचार घडून आला होता. याच पार्श्वभूमीवर या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा केला. अमरावती बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केले. ‘त्यामुळे आम्ही मार खाऊ देणार नाही, एकतर्फी कारवाईच्याविरोधात भाजप जेलभरो करेल’, असा इशारा फडणवीसांनी महाविकास आघाडीला दिला आहे. त्यामुळे आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये गट-तट पाहिले जात नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अमरावतीत दंगल कोणी पेटवली हे साऱ्या जनतेला माहित असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच भाजप राजकीय पोळी शेकण्यासाठी आंदोलन करत असल्याचा टोलाही संजय राऊतांनी फडणवीसांवर लगावला आहे. तसेच तुम्हीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. त्यामुळे तुमच्या मुख्यमंत्री काळात रझा अकादमीवर बंदी का घातली नाही? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
अमरावती बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांना अकट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे हिंदूवर गुन्हे दाखल झाले असे म्हणता येणार नाही. भाजप राजकीय पोळी शेकण्यासाठी आंदोलन करत असून आगीत तेल ओतण्याचे काम भाजप करत आहे. अमरावतीमध्ये शांतता राखण्यासाठी भाजपने आंदोलन करावे, असे ते म्हणाले.