राम मंदिराच्या निर्माणाला विलंब होण्यास काँग्रेसच जबाबदार – पंतप्रधान

राम मंदिराचा मुद्दा देशभरात चर्चेत असताना आज राजस्थानमध्ये एका निवडणूक सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन अखेर मौन सोडलं आहे. राम मंदिराच्या निर्माणाला विलंब होण्यास काँग्रेसच जबाबदार आहे, अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे अशी काँग्रेसची इच्छा नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.
राजस्थानच्या अलवार येथे एका सभेत बोलताना मोदींनी राम मंदिराच्या मुद्यावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. राम मंदिराच्या निर्माणाला विलंब होण्यास काँग्रेसच जबाबदार आहे. 2019 पर्यंत राम मंदिराचा निकाल यावा असे काँग्रेसला वाटत नाही.
2019 मध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे याबाबतची सुनावणी घेऊ नये अशी मागणी काँग्रेस आपल्या वकिलांद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे करते. इतकंच नव्हे तर त्यांचे नेता न्यायाधीशांना महाभियोग प्रस्तावाद्वारे घाबरवण्याचा प्रयत्न करतात. मोठमोठ्या वकिलांद्वारे राम मंदिराचा मुद्दा ताटकळत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.