Fri. Aug 12th, 2022

कोरोनायोध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड -१९ फ्रंटलाइन वर्कर्ससाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा क्रॅशकोर्स सुरु करण्यात आला आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री महेंद्र नाथ पांडेसुद्धा यावेळी उपस्थित होते.

कोविडयोद्धयांना होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, अ‍ॅडव्हान्स केअर सपोर्ट, इमरजन्सी केअर सपोर्ट नोकरीच्या क्षेत्रांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
केंद्रीय कौशल विकास योजना ३.० अंतर्गत या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून या योजनेसाठी एकूण २७६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

देशाची वाढती लोकसंख्या पाहता आरोग्य क्षेत्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील कोरोना योध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती करण्यात आली असून त्या माध्यमातून एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

‘देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी या क्रॅशकोर्सची मागणी केली होती. त्यामुळे देशातील सर्वोत्तम तज्ज्ञांच्या सहाय्याने केंद्र सरकारने हा क्रॅश कोर्स तयार केला आहे. त्या माध्यमातून दोन ते तीन महिन्यात एक लाख युवकांना प्रशिक्षत करण्यात येणार आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
या क्रॅश कोर्समध्ये सहा प्रकारचे विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्राला एक नवीन उर्जा मिळणार असून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंगची गरज लक्षात घेता या आधीच केंद्र सरकारने केंद्रीय कौशल्य मंत्रालयाची स्थापना केली आहे असं पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, त्यामुळे आपणही त्यानुसार बदल आवश्यक असल्याचं सांगत अपस्किलिंगचं महत्व पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. तसेच देशात येत्या २१ जूनपासून व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून त्यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.