Sat. Feb 29th, 2020

लहान मुलांसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या विकृताला पोलिसांनी घातल्या बेड्या

भिवंडी शहरातील आदर्श पार्क परिसरातील  एका इमारतीच्या आवारात लहान मुलांसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या विकृत इसमाला पोलिसांनी अटक केलं आहे. या विकृत माणसाबद्दल घाबरलेल्या मुलांनी आपल्या घरी पालकांना सांगितल्यामुळे या इसमाचा ताबडतोब पर्दाफाश झाला. पालकांनी निजामपुरा पोलीस ठाणे गाठून त्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी नझराना कंपाऊंड येथील राधाकृष्ण सोसायटीत राहणाऱ्या कमलेश शांतीलाल जैन या 36 वर्षीय विकृतास अटक करून बेड्या ठोकल्या आहेत .

काय घडलं नेमकं?

आदर्श पार्क या परिसरातील 4 ते 9 वर्ष दरम्यानची लहान मुलं मुली इमारतीखाली कुत्र्यासोबत खेळत होती.

यावेळी कमलेश जैन नामक विकृत इसम आपलं गुप्तांग बाहेर काढून त्या ठिकाणी आला.

त्याने तेथील लहान मुलांसोबत विकृत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला असता मुलांनी घाबरून घरात पळ काढला.

मुलांच्या मनामध्ये त्या विकृत व्यक्ती बद्दल भीती निर्माण झाली.

रात्री आईने मुलास कपडे बदलण्यास सांगितलं असता त्याने घाबरून ‘अंकल येईल’ असं सांगत कपडे बदलण्यास नकार दिला.

त्याबाबत पालकांनी मुलांकडे संपूर्ण चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

त्यानंतर पालकांनी या घटनेची खातरजमा करण्यासाठी इमारती मधील सीसीटीव्ही तपासलं.

त्यामध्ये विकृत माणसाचं लहान मुलांशी चाललेलं किळसवाणं वर्तन दिसून आलं.

या प्रकाराने धक्का बसलेल्या पालकांनी निजामपुरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलांची कैफियत सांगितली.

पोलिसांनीही CCTVच्या आधारे विकृत कमलेश शांतीलाल जैन यास त्याच्या घरातून ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात भादंवि कलम 354 सह POCSO कायद्यांतर्गत कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करत अटक केलं. भिवंडी न्यायालयात आरोपीला हजर केलं असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्याची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव भुसारे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *