मुलांना पळवून नेणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सांगलीतील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते आणि विश्रामबाग पोलिसांनी हाणून पाडला आहे.
सांगली शहरातील हनुमान नगरमध्ये राहणारी तीन मुले खेळत खेळत सांगलीच्या रेलवे स्टेशनवर आली. यावेळी एका इसमाने या तीन मुलांना तुम्हाला तुमच्या वडीलांनी बोलावले आहे. असे सांगून बुधवारी रात्रीच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेसमधून मुंबईकडे नेत होता.
मुले बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलल्यानंतर ही तीन मुले एका इसमासोबत रेल्वेमधून पुण्याच्या दिशेने चालले असल्याची माहिती मिळाली.
सांगली पोलिसांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना ही माहिती दिली. यानंतर महालक्ष्मी एक्स्प्रेस सातारा स्टेशनवर येताच सातारा पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी मुलांना घेऊन जाणाऱ्या संशयितास ताब्यात घेऊन तीनही मुलांची सुखरूप सुटका केली.
यामध्ये विश्रामबाग पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे आणि नगरसेवक अभिजित भोसले यांनी तातडीने हालचाली केल्यामुळे या मुलांची सुटका झाली.