Tue. Jul 7th, 2020

नक्षली संबंधांसदर्भात पोलिसांचा गौप्यस्फोट

एल्गार परिषदेच्या आयोजनाशी कथित संबंध असणा नक्षलीसंबंधांच्या कारवाईवरून मुंबई आणि पुणे येथील पोलिसांनी आज पत्रकार परिषद आयोजित करून मोठा गौप्यस्फोट केला. या संदर्भात अटक केलेल्या लोकांचे नक्षलवाद्यांचे संबंध असल्याचे पुरावेच पोलिसांनी जाहीर केले. नक्षलींशी संबंध दाखवणारी अनेक पत्रंही पोलिसांनी सादर करत त्यातील काही वाचूनही दाखवली.

कॉम्रेड सुधा भारद्वाज, रोना विल्सन,मिलिंद तेलतुंबडे यांच्या पत्रांमधून नक्षलवादी चळवळीच्य योजना, त्यासाठी आर्थिक सहाय्य, शस्त्रास्त्रं यांबाबतचे उल्लेख आढळून आले. सुधा भारद्वाज यांच्या पत्रात प्राध्यापक साईबाबाला झालेल्या शिक्षेमुळे कॉम्रेड्समध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणची चिंता केली गेली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील कॉम्रेड्ससाठी कामानुसार पॅकेज निश्चितीचीही यात चर्चा आहे. तसंच कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडे यांच्याकडील पत्रात वरावर राव यांच्या सांगण्यावरून गाड्या जाळल्याचं स्पष्ट केलं आहे. जास्त प्रसिद्धीसाठी येत्या काही दिवसांत मोठी कारवाई करावी लागेल, असंही यात सुचवलं आहे.

तसंच काही पत्रांमध्ये जम्मू काश्मिर, मणीपूर येथील फुटिरतावाद्यांशी संबंध असल्याचंही समोर आलं आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांना नक्षलवादाचं ट्रेनिंग देण्याचाही उल्लेख आहे. सरकार उलथून टाकून देशाला धोका निर्माण करण्याचा नक्षलींचा बेतही स्पष्ट असल्याचे पुरावे पोलिसांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. राजीव गांधींप्रमाणे घातपात करण्यासंदर्भातले उल्लेखही यातील एका पत्रात आहे.

परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत शहरी नक्षलवाद हा नवा नसून जुनाच असल्याचे म्हटले. कोर्टात सादर करावेत, त्याप्रमाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले. 29 ऑगस्टला छाप्यामधून महत्त्वाची कागदपत्रं हाती लागल्याचंही परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *