Thu. Jan 20th, 2022

एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावर जाण्यापासून रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न

  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील अनेक एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदान येथील आंदोलनात हजेरी लावण्यासाठी येत आहेत. मात्र पोलिसांनी मुंबईच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करून एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.

  खारघर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून प्रत्येक गाडीची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. वाहनात एसटी कर्मचारी आढळल्यास त्यांना ताब्यात घेतले जात आहे. पहाटेपासून ६० ते ८० एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिन होत नाही तोवर एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीसुद्धा आंदोलन मागे न घेतल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

  ‘एसटी कामगारांच्या २८ युनियन आहेत. त्या सर्वांच्या प्रतिनिधींसोबत बसून सरकारने कामगारांच्या अनेक मागण्या मार्गी लावल्या आहेत. विलिनीकरणाच्या व्यतिरिक्त आणखी कुठलेही मुद्दे असतील तर त्यावरही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण प्रत्येकाशी चर्चा करणे शक्य नाही. त्यामुळे चर्चा नेमकी कुणाशी करायची हे कामगारांनीच सांगावे,’ असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

  ‘परिवहन मंत्री दिवस रात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लक्ष घालताय, आम्हाला अस वाटते एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावे आणि ते सोडवले देखील आहेत,’ अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *