कोरोनाग्रस्तांना ‘बाहुबली’ प्रभासची ४ कोटींची तर अल्लू अर्जुनची १.२५ कोटींची मदत

कोरोना विषाणुविरोधात भारतामध्ये सुरू असलेल्या लढाईत अनेक कलाकार आपल्या परीने अर्थसहाय्य तसंच मदत करत आहेत. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लाखो मास्क्स वाटले. दक्षिण सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी ५० लाखांची मदत केली, तर अभिनेते कमलहासन यांनी तर आपलं घरच कोरोनाबाधितांसाठी रुग्णालयात परिवर्तित करायला परवानगी दिली आहे. तेलुगू अभिनेता ‘बाहुबली’ प्रभास याने ४ कोटी रुपयांची तर अल्लू अर्जुन याने १.२५ कोटी रुपयांची मदत केली आहे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांतल्या कोरोनाग्रस्तांसाठी दाक्षिणात्य सुपरस्टार्स मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत. चिरंजीवी, साई धरम तेज, पवन कल्याण, महेश बाबू या तेलुगू कलाकारांनी जनतेसाठी कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे.
अल्लू अर्जुन याने ट्विट करत डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सैन्य लोकांची मदत करत आहेत. त्यांच्याचकडून प्रेरणा घेऊन मी १.२५ कोटी रुपयांची मदत करत आहे. लोकांनी लॉकडाऊनला गांभीर्याने घेत घरात राहावं आणि स्वच्छता पाळावी असं अल्लू अर्जुन याने म्हटलं आहे