गर्भधारणेतील मधुमेहाची जोखीम आणि प्रतिबंध

गर्भावस्थेपूर्वी मधुमेह नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला गर्भधारणेदरम्यान तात्पुरत्या अवस्थेत मधुमेह होऊ शकतो. यालाच जस्टेशनल डायबेटीस असे म्हणतात. अन्य प्रकारच्या मधुमेहाप्रमाणे, गर्भधारणेतील मधुमेह हा तुमच्या पेशी रक्तातील साखर (ग्लुकोज) कशी वापरतात त्यानुसार प्रभाव टाकतो.
डॉ आशुतोष सोनावणे यांच्यानुसार गर्भावस्थेत सामान्य असणाऱ्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास गर्भधारणेतील मधुमेहाचे निदान होते. हे निदान करण्यासाठी ७५ ग्रॅम (ओ. जी. टी. टी.) ही तपासणी केली जाते. ह्यात उपाशी पोटी साखर तसेच ७५ ग्रॅम ग्लुकोज चे पेय दिल्यानंतर १ व २ तासांनंतर साखर तपासली जाते. गर्भधारणेतील मधुमेहाचा परिणाम गर्भावस्था तसेच शिशूच्या आरोग्यावर जाणवतो. आरोग्यदायी आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम आणि आवश्यकता असल्यास; डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधांचे सेवन केल्याने गर्भवती महिला या प्रकारातील मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकते ही या विकाराची चांगली बाजू म्हणावी लागेल.
रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राखल्याने माता आणि तिच्या बाळाची प्रकृती आरोग्यदायी राहते. प्रसुती दरम्यान होणाऱ्या गुंतागुंतीला प्रतिबंध शक्य होतो.
गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या मधुमेहासाठी जबाबदार विविध जोखीम घटक खालीलप्रमाणे:
● संप्रेरक (हॉर्मोन) स्त्रावात बदल (गर्भावस्थेत हार्मोन म्हणजे संप्रेरकातील बदल निश्चितच घडतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे कार्य सुरळीत पार पाडण्यात अडथळे येतात. जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी वाढते)
● प्रमाणापेक्षा वजन अधिक असणे किंवा लठ्ठ असणे
● शारीरिक हालचालीचा अभाव
● गर्भावस्थेत मधुमेह किंवा त्यापूर्वी मधुमेहाची पार्श्वभूमी असणे
● कुटुंबात मधुमेही सदस्य असणे
● इन्सुलिनच्या कार्यात चढ-उतार आणणाऱ्या अन्य आरोग्यविषयक समस्या अथवा पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस)
● उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, हृदय विकार किंवा अन्य वैद्यकीय गुंतागुंत असणे
● अगोदर लठ्ठ बाळाला जन्म देणे (ज्याचे वजन 9 पौंड म्हणजे 4.1 किलोहून अधिक असेल)
गर्भावस्थेतील मधुमेहाला प्रतिबंध करण्यासाठी काय करता येईल?
गर्भावस्थेतील मधुमेहाची जोखीम कमी करण्यासाठी खालील पावले उचलली गेली पाहिजेत:
आरोग्यदायी आहार घेण्यावर लक्ष केंद्रित करणे: आहारात फळे, भाज्या तसेच प्रक्रियारहित धान्यांचे प्रमाण वाढवणे. तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असलेला तसेच फॅट (मेद) आणि उष्मांक कमी असलेला आहार घेणे.
शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहणे: नियमित व्यायाम करणे. वेगाने चालण्याच्या व्यायामासोबत 30 मिनिटे सामान्य हालचालीला प्राधान्य द्या.
गर्भधारणेपूर्वी आरोग्यदायक वजन राखणे: जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करत आहात, तर त्यापूर्वी अतिरिक्त वजन कमी करा. जेणेकरून तुम्हाला आरोग्यदायक गर्भधारणेकरिता मदत होईल.
अधिक वजन वाढण्यापासून स्वत:ला रोखणे: गर्भावस्थेत काही प्रमाणात वजन वाढणे हे सामान्य आणि आरोग्यदायी असते. मात्र अधिक प्रमाणात वजन वाढल्यास जस्टेशनल डायबेटीस म्हणजे गर्भावस्थेतील मधुमेहाची जोखीम वाढते. गर्भावस्था आरोग्यदायक असावी याकरिता किती वजन आवश्यक असते याविषयी तुमच्या डॉक्टरांसमवेत बोला.
गर्भावस्थेपूर्वी आणि त्यानंतर शक्य तितक्या आरोग्यदायी सवयींचा अंगीकार करणे हा मुख्य प्रतिबंध ठरतो.