Thu. Sep 16th, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई रुपी’ सेवेचा शुभारंभ

नवी दिल्ली : भारतात नव्यानं सादर होत असलेलं डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘ई रुपी’ चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सोमवारी चार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. तसेच हे प्लॅटफॉर्म नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मदतीने तयार करण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे या सेवेसाठी कुठलंही अॅप, इंटरनेटची आवश्यकता नाही.

एकवीसाव्या शतकात भारत कशा पद्धतीनं पुढे चालला आहे तसेच आधुनिक तंत्रज्ञानानं लोकांशी कसा जोडला जात आहे, याचं ‘ई रुपी’ सेवा हे एक उदाहरण आहे. देशातील नागरिक ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना ही सेवा सुरु झाली असून याचा मला खूप आनंद होत आहे, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
या सेवेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशात डिजिटल पेमेंट आणि थेट बँक ट्रान्सफरला चालना देण्यासाठी ‘ई रुपी’ व्हाऊचर महत्वाची भूमिका ठरेल . यामुळे सर्वांना कोणत्याही अडथळ्याशिवाय मोफत पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे.”

काय आहेत ई रुपी चे फायदे?

  • ई-रुपी कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिजिटल पेमेंट आहे
  • योजनेचा लाभ देणारे आणि लाभ घेणारे दोघांशी डिजिटली संपर्क करता येणार आहे
  • कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप, इंटरनेटशिवाय पेमेंट करता येणार आहे
  • यामध्ये क्यू-आर कोड किंवा एसएमएसच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे
  • ई-रुपी मानवी हस्तक्षेपाशिवाय सेवांचे प्रायोजन, लाभार्थी आणि सेवा पुरवणारे यांचा डिजिटली जोडले ठेवणार आहे
  • व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सेवा पुरवणाऱ्याला पेमेंट मिळणार आहे
  • ई-रुपी प्री-पेड स्वरुपाचे आहे आणि वेळेवर पेमेंट व्यवहार होतो
  • बालकल्याण, टीबी निर्मूलन, आयुष्यमान भारत, पंतप्रधान आरोग्य योजना, खतांवर अनुदान या सरकारी योजनांसाठी ई-रुपी कार्डचा वापर केला जाऊ शकतो
  • हे डिजिटल व्हाऊचर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही वापरता येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *