कोरोनामुळे मानसिक आजारात वाढ

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय मानसोपचार कमिटीने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. कोरोनाचे रुग्ण अनेक ठिकाणी आढळून येत असताना मानसिक आजाराचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोनामुळे जीवनशैलीवर परिणाम होऊ लागला आहे. भीतीचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे अचनाक २० टक्क्यांनी मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे.
एकाच आठवड्यात सुमारे २० टक्क्यांनी रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा परिणाम अनेक लोकांवर झाला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. तसंच अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. अनेक लोक घराबाहेर न पडल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. छोटेमोठे व्यवसाय बंद पडले आहेत. कंपन्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देऊनही कर्मचारी पगाराबाबत घाबरलेले आहेत. एकूणच अस्वस्थता वाढली आहे. धंदा बुडण्याची किंवा नोकरी गमावण्याची भीती वाढली आहे. कमाई, बचत यांच्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती असल्याचे लोकांवर मानसिक परिणाम होत आहे, असं फोर्टिस हॉस्पिटलच्या मानसिक आरोग्य आणि वर्तणूक विज्ञान विभागाच्या प्रमुखांनी स्पष्ट केलं आहे.
याशिवाय दारू, सिगरेटचं व्यसन असणाऱ्या लोकांना या वस्तू न मिळाल्याने त्रास होतोय. त्याचाही परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतोय. त्यामुळे या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला नसला, तरी मानसिक आजार मात्र वाढला आहे.