देशभरात ‘कोव्हिशिल्ड’लसीचे वितरण सुरू
१६ जानेवारीपासून होणार लसीकरणाला सुरुवात…

सीरम इन्स्टिटयूटच्या कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’लसीचे देशभरात वितरण सुरू होणार असून लसीकरणाचे वितरण १६ जानेवारीपासून होणार आहे. पुण्यातून लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आले आहेत. त्यापैकी तीन कंटेनर हे पोलिसांच्या बंदोबस्तासह पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. कंटेनर रवाना होण्यापुर्वी इन्स्टिटयूटच्या परिसरात कंटेनरची पूजा करण्यात आली असून परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते हार घालून आणि नारळ फोडून या कंटेनर्सना मार्गस्थ करण्यात आले. शिवाय यावेळी काही कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत पेढे वाटून आनंद साजरा केला.
पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस ही देशभरातील १३ शहरांमध्ये पाठविण्यात येणार असून यामध्ये अहमदाबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी ८ वाजता रवाना होणार आहे. ८ फ्लाईटपैकी २ फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गुवाहाटी येथे जाणार आहे. भारत सरकारने लस खरेदीसाठी काल सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला ऑर्डर दिली होती. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २१० रुपये असेल असे सीरमच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले आहे. सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लसीची निर्मिती पुणे स्थित सीरम इन्स्टिटयूटने केली आहे.