Tue. May 17th, 2022

राजेश क्षीरसागरांना ‘मातोश्री’ची प्रतीक्षा

महाविकास आघाडीत सामील झालेल्या शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मत घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही असे चित्र आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या पोटनिवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेची ही अडचण अधोरेखित झाली आहे. काँग्रेसच्या आमदारांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर शिवसेनचे राजेश क्षीरसागर इच्छुक आहेत. त्यांनी या मतदार संघाचे दोन वेळा प्रतिनिधित्वही केले आहे. मात्र काँग्रेस ही जागा सोडणार नाही हे निश्चित आहे तर महाविकास आघाडीत असल्याने सेनेला भूमिका घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांना मातोश्रीच्या आदेशाची प्रतीक्षा लागली असून त्यानी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे.

कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे अकाली निधन झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय गोटातून आता हालचाली सुरू झाल्या आहेत. या मतदार संघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा मैदानात उतरण्याचा चंग बांधला असून मातोश्रीवरून त्यांना हिरवा कंदील मिळतो का याची प्रतीक्षा आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला उमेदवारीची ऑफर देण्यात आली असून सध्या तरी जयश्री जाधव यांनी या बाबत मौन बाळगले आहे.

राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पक्षाने दिलेल्या आदेशासाठी ते जीवाचे रान करायला तयार असतात. मराठी भाषिकांच्या विरोधात ज्यावेळी कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिका उपद्रव करत होती. त्यावेळी कोल्हापुरात कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांना चोप देण्याचे काम त्यांनी केले. त्यावेळी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा सन्मान केला होता. सेनेच्या तिकिटावर ते दोन वेळा आमदारही झाले. मात्र २०१९च्या निवडणुकीत १५ हजार १९९ मतांनी पराभूत झाले. त्या ठिकाणी नवख्या असलेल्या चंद्रकांत जाधव यांनी विजय मिळवला.

त्यावेळच्या २०१९च्या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली होती. कारण या जागेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढण्याची शक्यता होती. मात्र राजेश क्षीरसागर हे ही जागा सोडायला तयार नव्हते. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना थेट कोथरूड गाठावे लागले होते. भाजपच्या हाताला ही जागा लागली नसल्याने चंद्रकांत जाधव या मूळच्या भाजपच्या विचारांच्या उमेदवाराचे नाव पुढे आले आणि ते या जागेवर निवडून आले. त्यामुळे चंद्रकांत जाधव यांना नेमकी रसद कोणी पुरवली याचे राजकारण ही आता तापू लागले आहे. भाजपने यावेळी सेनेला मदत न करता खंजीर खुपसला असा आरोपच थेट शिवसेनेचे शहराध्यक्ष करत आहेत.

दरम्यान नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी डावलत भाजपला जवळ केले याचा दाखला देत राजेश क्षीरसागर आपली उमेदवारी मागत आहेत. तर काँग्रेसच्या विद्यमान आमदारांची ही जागा आसल्याने काँगेसचा यावर प्रबळ दावा असणार आहे. त्यामुळे या जागेचे कोडे थेट वरिष्ठ पातळीवरून सोडवावे लागणार आहे. राजेश क्षीरसागर याना राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्षपद देऊन शिवसेने यापूर्वी ताकद दिली आहे. पक्षात क्षीरसागर यांचा वेगळा ठसा आहे. त्यामुळे त्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

खरतर विधानसभेची एखादी जागा रिक्त झाली तर सहा महिन्यात पोटनिवडणूक होऊन ती भरली जाते. त्यामुळे या निवडणुकीला सुद्धा इतके दिवस जातील असा अंदाज बांधून सर्व शांत होते. मात्र पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या रिक्त जागेबाबतची माहितीही निवडणूक विभागाने मागितली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी ही निवडणूक जाहीर होऊ शकते. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार की आघाडीत बिघाडी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

– ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर

( या मताशी संपादक अथवा प्रकाशन संस्था सहमत असतीलच असे नाही. या लेखात लेखकाने मांडलेली मते स्वतंत्र आहेत. )

1 thought on “राजेश क्षीरसागरांना ‘मातोश्री’ची प्रतीक्षा

  1. This definitely be the next preference. You are perfect, theme team. I Really enjoy the system, fonts along with the perfect subject. Thanks for a great valuable design. Great job! Keep up the ultra do the webjob!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.