‘रामायणा’तील सुग्रीवाची भूमिका करणारे अभिनेते कालवश

लॉकडाऊन दरम्यान दूरदर्शनने ३३ वर्षांपूर्वी टीव्हीवर इतिहास घडवणारी ‘रामायण’ मालिका पुन्हा दाखवण्यास सुरूवात केली. या मालिकेने पुनर्प्रक्षेपण सुरू झाल्यावरही पुन्हा लोकप्रियतेचा उच्चांक गाठलाय. २०१५ पासून इतका TRP कोणत्याच मालिकेला मिळाला नव्हता. सध्या ही मालिका घराघरात तितक्याच उत्साहाने पाहिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच ‘रामायण’ मालिकेत हनुमान, वानरराज सुग्रीव आणि वानरसेनेचा प्रवेश झाला. सुग्रीव आणि वाली युद्धाचा भागही अत्यंत रोचक पद्धतीने रंगवण्यात आला. मात्र पुनर्प्रक्षेपित भागात जेव्हा सुग्रीवाचा ट्रॅक सुरू झाला, नेमका त्याच सुमारास सुग्रीवाची भूमिका साकरणारे कलाकार श्याम सुंदर कलानी यांचं निधन झालं.
‘रामायण’ मालिकेत सुग्रीवाची भूमिका अजरामर करणारे श्याम सुंदर कलानी यांचं नुकतंच कॅन्सरमुळे निधन झालं. हरयाणा येथील कालका शहरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामायण मालिकेतील राम साकारणारे अरुण गोविल यांनी Twitter वरून श्रद्धांजली अर्पण केली. ‘रामायण मालिकेत सुग्रीवची भूमिका करणारे श्याम सुंदर यांचं निधन झाल्याचं कळलं. त्यामुळे मला फार दुःख झालं. ते अत्यंत सज्जन व्यक्ती होते. रामायण मालिकेतून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. मात्र दुर्दैवाने त्यानंतर त्यांना जास्त काम मिळालं नाही.’
लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनिल लाहिरी यांनीदेखील ट्वीट करून श्याम सुंदर कलानी यांना श्रद्धांजली वाहिली.
रामायण मालिका पुन्हा सुरू झाल्यापासून लोकप्रियतेचे उच्चांक मोडू लागली आहे. पहिल्या तीन एपिसोड्सनी सर्वाधिक TRP चा विक्रम केला. भरतभेटीच्या एपिसोडलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता मालिका राम-रावण युद्धाच्या दिशेने जात आहे.