Mon. Jan 17th, 2022

संत्र्यांची दरवाढ, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

छगन जाधव , जय महाराष्ट्र , अमरावती

विविध आजारांवर संत्रा उपयुक्त ठरतो. संत्र्याला नारंगी म्हणुन सुध्दा ओळखतात. संत्र्यामध्ये ‘व्हिटामिन C’ चं प्रमाण जास्त असतं. संत्री ही पोटॅशियममध्ये समृध्द असतात. संत्र्याचा रस नियमित प्यायल्यास मुत्रपिंड रोगापासून बचाव होतो. संत्रं चरबी आणि कॅलरी मुक्त असतात.

विदर्भाची ओळख इथल्या संत्रामुळेच. म्हणुनच नागपूर आणि अमरावतीला विदर्भाचा कॅलीफोर्निया म्हणून ओळखलं जातं. या संत्र्याच्या चवीसाठी देशभरातील नागरिकांचा ओढा विदर्भाकडे असतो. विदर्भातली संत्री जगभरात निर्यात होतात. पण आता संत्रं निर्यात वाढीला कारणीभूत ठरलाय तो करोना व्हायरस… सध्या या व्हायरसमुळे संत्र्याची मागणी जगभरात वाढलीय. सोबतच दरवाढ सुध्दा झालीय.

मागील काळापासुन संत्र्याचे दर कोसळले होते. यावर्षी देखील अमरावतीतील संत्री उत्पादकांनी संत्री मातीमोल भावात विकली. पण आता जगात कोरोना विषाणुने थैमान घातलय. अशा परिस्थितीत समज आणि गैरसमज वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर इतर देशामध्ये संत्राची मागणी वाढली आहे. याचा फायदा संत्रा उत्पादकांना होणार असल्याचा दावा महाऑरेंज संस्थेने केलाय.

मृग बहारानंतर हवामानात बदल होतो. तापमानात वाढ होते. तापमानाचा फटका बसू नये. याकरीता संत्रा उत्पादक 10 मार्च आधीच संत्री विकून टाकतात. त्यामुळे आता या वाढत्या भावाचा फायदा थेट व्यापाऱ्यांना होणार असून सध्या विकण्यासाठी संत्रीच नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दाव्यात फारसं तथ्य नसल्याचं संत्रा उत्पादकांचं म्हणण आहे.

आंबिया बहारात संत्र्याला समाधानकारक भाव मिळाले नाही. त्यामुळे मृग बहारात संत्री उत्पादकांना चांगल्या बाजारभावाची अपेक्षा होती. मात्र विदर्भात फक्त 10 ते 12 हजार रुपये प्रति टन संत्री विकण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आलीय.

कोरोना व्हायरसमुळे जरी संत्राला चांगले दिवस आले असले तरी यांचा थेट फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांना होणार आहे यात दुमत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *