मला भेटलेली ‘ती’…

एकविसाव्या शतकात महिलांनी बरीच गगनभरारी घेतलीय. आता कोणतेही क्षेत्र असं नाही ज्यामध्ये महिलांचा वावर नाही. प्रत्येक क्षेत्रात ती कणखर पाय रोवून उभी आहे. याचं कौतुक व्हायलाच हवं…
आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर महिलांचा सहवास लाभत असतो. आई, ताई, मैत्रीण, प्रेयसी अशा अनेक महिला आपल्या आयुष्यात आलेल्या असतात किंवा येणार असतात. आज महिला दिन… सर्वत्र हा दिवस जसा धुमधडाक्यात साजरा केला जातो. तसाच ग्रामीण भागातही केला जातो. बारावीमध्ये शिक्षणासाठी बाहेर गावी असताना मला एका ताकदवान माहिलेला जवळून पाहता आले.
मी शिक्षणासाठी बाहेरगावी रूम घेऊन राहत होतो. माझ्या रूमच्या बाजूला एक मुलगी राहत होती. वयाने माझ्यापेक्षा 1 ते 2 वर्षाने मोठी होती पण आमच्यात मित्रत्वाचे संबंध असल्याने आम्ही एकमेकांशी फ्रेंडलीच संभाषण करायचो. बारावीचे शिक्षण घेत असताना आमच्याकडे एक ट्रेंड होता. जी मुलं काठावर पास होतात, त्यांची एडमिशन ज्या कॉलेजला परीक्षेला कॉपी पुरवल्या जातात तिथे करत आणि त्यांना खाजगी क्लास(ट्युशन) करता शहरात पाठवत. मी ही त्याच ट्रेंडमधील एक…
मग काय खाजगी क्लासेस झाले की दिवस भर रूमवर रहायचं. हाच आमचा दिनक्रम असायचा. ती दिवसभर फिरुन शिवण क्लाससाठी गावोगावी जाऊन एडमिशन करत राहायची. तीसुध्दा आठवडयातून एक ते दोन दिवस घरीच थांबायची. त्यामुळे आमची मैत्री कधी जमली ते समजलेच नाही. गप्पा मारणे, थट्टा मस्करी करणं, एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करणं, फिरायला जाणं आणि शाळेतल्या गप्पा गोष्टीत मन रमवणं असंच आमचं बोलणं सुरु असायचं. तिच्या घरी छोटा भाऊ, वडील आणि आई आहेत, असं तिने सुरुवातीला सांगितलं होतं आणि घरची घरची परिस्थिती बेताची असल्याने असं परगावी राहून नोकरी करत असल्याचं तिने सांगितले होते. तिचा लहान भाऊ सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतोय याची एकदा तिने मला माहिती दिली होती. आमच्यामध्ये मैत्रीपूर्ण नाते निर्माण झाले होते. दुसरीकडे मी एडमिशन कॉपी सेंटरला असल्यामुळे अभ्यासाचं तेवढं टेन्शन घेत नव्हतो. फक्त नियमित क्लासला जायचं एवढाच दिनक्रम असायचा. ती मात्र नियमीत नोकरीच्या ठिकाणी जायची. मी एक दोन वेळासोबत तिच्या ऑफीसलाही गेलो होतो. आमच्या मैत्रीत एक नितळ भावना होती. त्यामुळे रुसवा फुगवा हे नित्याचेच झाले होते.
एक दिवस मला चहा प्यावासा वाटत होता. ती त्या दिवशी रुमवरच असल्याने मी तिच्याकडे जाऊन चहा घेण्याचे ठरवले. चहासाठी काही साहित्य आणण्यासाठी ती बाहेर गेली. माझे लक्ष तिच्या पर्सकडे गेले. ती तिथेच विस्कटलेल्या अवस्थेत पडली होती. मी ती व्यवस्थित ठेवण्यासाठी उचलली तेव्हा त्यामधून एक लहान मुलाचा फोटो खाली पडला. मी उत्सुकतेपोटी पर्स पुन्हा उघडली. मला आणखी एक फोटो सापडला. त्या फोटोमध्ये ती आणि एक व्यक्ती होती. मी ते पाहत असतानाच ती आली आणि माझ्या हातातून तीने पर्स हिसकावून घेतली. ती माझ्यावर संतापून ओरडली. मला काही समजले नाही. नेमकं झालं काय? तिला अचानक असं पाहून माझ्या लक्षात आलं की ती माझ्यापासून काही तरी लपवत आहे. त्या दिवशी मी तिथून निघून गेलो पण त्यानंतर वारंवार मी तिला त्या फोटोंबाबत विचारत राहिलो. काही दिवसानंतर मला समजले त्य फोटोतला चिमुरडा हा तिचाच मुलगा होता आणि दुसर तिचा नवरा होता. तिने आणि तिच्या नवऱ्याने पळून जाऊन लग्न केलं होतं. दोघे एकाच जातीचे होते. पण गरीब आणि श्रीमंत ही अजून एक पोटजात कुठे कुठे दिसून येतेच. या लग्नाला मुलाच्या घरातल्यांचा विरोध होता. तरीसुध्दा तो विरोध मावळला लग्न झाल्यानंतर तीन महिन्यानंतर घरच्या मंडळीनी यांना स्वीकारले. काही दिवसांनंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण नेमके त्याच दरम्याण तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर काही दिवसातच तिला तिच्या सासरच्या माणसानी घराबाहेर काढले. माहेरच्यांची बेताची परिस्थिती होती. त्यामुळे त्यांनाही काही करता आलं नाही. आता तिच्या नशीबी रोज फोटो पाहून अश्रू ढाळणंच उरलं आहे.
काही दिवसांनतर तिने माझ्यासोबत अबोला धरला. बोलणं कमी केलं. मी सुद्धा परीक्षा जवळ आल्याने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले. एक दिवस मी गावाकडे असताना मला तिचा फोन आला. तिने आपण हे शहर सोडून जात आहे असं सांगितलं. त्यानंतर माझं आणि तिचं कधी बोलणं झालंच नाही. तिला रोखणं माझ्या हातात नव्हतं. कारण तिला तिचं जग स्वतःलाच शोधायचं होतं. त्यानंतर मात्र तिचा कधी फोन आला ना तिला कधी फोन लागला. आता मी सुद्धा माझ्या जीवनात व्यस्त झालो आहे. पण कधीतरी एखाद्या सायंकाळी त्या धाडसी महिलेची आठवण मला येते. या माहिला दिनालासुध्दा तीची आठवण झालीच.
माझ्या ‘त्या’ मैत्रिणीला आणि तिच्याप्रमाणेच परिस्थितीचं विष पचवून उभं राहणाऱ्या आणि विविध आघाड्यांवर लढा देणाऱ्या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…