राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकार मा.गो. वैद्य यांचं निधन
वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर नागपूरच्या स्पंदन रुग्णालयात उपचार सुरू होते. ते संघाचे पहिले प्रवक्ता होते. 1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणाऱ्या मा. गो. वैद्यांना पत्रकारिता आणि समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते.
मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते. 1948 साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ‘सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक त्यांनी लिहिले. 1978 साली मा. गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळची त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली.