Fri. Jan 28th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा ! सैनिकी शाळेत आता मुलींना शिकता येणार!

संपूर्ण देश आज ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे.पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रध्वज फडकवून देशाला संबोधित केलं. लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
यावेळी भारतीय हवाई दल्याच्या एनआय-१७१वी या हेलिकॉप्टर्सद्वारे पुष्पवृष्टी केली गेली . पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी मार्च २०२१ मध्ये अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ सुरू केला होता. हा समारंभ आता १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. यामध्ये कोरोनापासून देशातील क्रीडा क्षेत्र, तसेच उद्योग क्षेत्राविषयी देखील त्यांनी मत मांडलं. मात्र, यावेळी देशभरातील मुलींसाठी पंतप्रधानांनी एक मोठी घोषणा केली आहे.यातून स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने भारतानं अजून एक पाऊल पुढे टाकल्याच्या भावना व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिला आणि मुलींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व सैनिकी शाळेत आता मुलींनाही प्रवेश मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मला लाखो मुलींचे संदेश मिळायचे की त्या देखील सैनिक शाळांमध्ये शिकू इच्छितात. त्यांच्यासाठी देखील सैनिक शाळांचे दरवाजे उघडले जावेत. दोन-अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिकी शाळांमध्ये पहिल्यांदा आम्ही मुलींना प्रवेश देण्याचा छोटासा प्रयोग आम्ही सुरू केला होता. आता सरकारने ठरवलं आहे की देशातल्या सैनिकी शाळांना देशातील मुलींसाठी देखील उघडलं जाईल”.
देशात सर्वच क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने दिसत असताना सेनेमध्ये मात्र हे प्रमाण बरंच व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर लष्करामध्ये आपलं भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या मुलींसाठी मोदींनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश सुरू करण्याचा निर्णय मोदींनी यावेळी जाहीर केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *